विदर्भ वार्ता |प्रतिनिधी
वणी : सार्धशती कडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्या येथील साहित्य, शैक्षणिक चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी येथील माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधवराव सरपटवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या संचालक समितीच्या बैठकीत माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
या परिसरात वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी या वाचनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. या परिसरातील नवोदित व मान्यताप्राप्त वक्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम वाचनालयाद्वारे सातत्याने करण्यात येते. 1874 साली इंग्रज काळात स्थापन झालेल्या या अ वर्ग वाचनालयामध्ये 27 हजारापेक्षा अधिक ग्रंथ संपदा आहे. महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रे व मासिके येथे वाचकांसाठी उपलब्ध आहेत. दरवर्षी 40 दिवाळी अंक 300 रुपये या माफक वार्षिक फी मध्ये वर्षभर वाचकांसाठी उपलब्ध राहतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी 30 रुपये मासिक वर्गणीने सर्व स्पर्धा परीक्षेची पुस्तके विद्यार्थ्या साठी उपलब्ध आहेत. येथे रोज 40 ते 50 विद्यार्थी अभ्यासिकेत येऊन नियमित अभ्यास करीत असतात.
या वाचनालयाच्या भरभराटीसाठी प्राचार्य राम शेवाळकर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक नानाजी भागवत, रतनलालजी जयस्वाल, डॉ. दिनकर मंगदे, माधवराव सरपटवार यांनी अतिशय परिश्रम घेतलेले आहे. त्यांच्यामुळेच नगर वाचनालयाला वैभव प्राप्त झाले आहे. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज दिनांक 7 डिसेंबरला पदभार घेतला आहे. या प्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष विशाल झाडे, सचिव गजानन कासावार, संचालक हरिहर भागवत, प्राची पाथ्रडकर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
