ठळक बातम्या

    वणी नगरपरिषद निवडणूक : * प्रभाग क्र. ११ 'ब' मध्ये वंचित बहुजन आघाडीचा 'मास्टरस्ट्रोक'...! * अपक्ष उमेदवार प्रशांत नक्षणे यांना 'वंचित'चे खुले समर्थन...!

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी :

    राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल संभ्रम असतानाच, वणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी मात्र अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. याच अंतिम टप्प्यात प्रभाग क्रमांक ११ 'ब' मध्ये राजकीय वारे वेगाने फिरले असून, वंचित बहुजन आघाडीने युवा अपक्ष उमेदवार प्रशांत शामराव नक्षणे यांना आपले खुले समर्थन जाहीर केले आहे. या पाठिंब्यामुळे प्रभाग ११ 'ब' मधील राजकीय समीकरणे बदलली असून, प्रशांत नक्षणे यांची बाजू भक्कम झाली आहे.

    ​आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत नक्षणे यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "केवळ जातीय समीकरणे आणि पैशाच्या राजकारणामुळे प्रस्थापित पक्षांनी मला डावलले आणि उमेदवारी नाकारली. सर्वसामान्य आणि वंचित घटकातून आलेल्या माणसाला जनतेची सेवा करण्याचा अधिकार नाही का? ही चीड मनात ठेवून मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे."

    माझ्याकडे कोणतेही पद नसताना मी आजवर निस्वार्थपणे समाजकार्य केले आहे आणि यापुढेही जनतेची सेवा हेच माझे एकमेव ध्येय असेल, असे नक्षणे यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले.

    ​वणीच्या विकासाचा बोजवारा : 

    राजू निमसटकर यांचा घणाघात. 

    वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी यावेळी भाजपसह काँग्रेस आणि उबाठा गटावर सडकून टीका केली. ते म्हणाले, "हाय-फाय विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी वणीच्या जनतेची केवळ लुटमार केली आहे. आजही शहरात आठवड्यातून केवळ एकदा पाणी येते, गल्लोगल्ली घाणीचे साम्राज्य आहे, रस्ते नाहीत, पथदिवे नाहीत आणि नजुल जमिनीचे प्रश्न प्रलंबित आहेत. सरकारी तिजोरी लुटणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीच वंचित निवडणूक लढवत आहे."

    प्रशांत नक्षणे यांच्यासारख्या तडफदार आणि जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वंचितने आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. जनतेने नक्षणे यांना भरभरून मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन निमसटकर यांनी केले. तसेच, "वणी नगरपरिषदेत वंचितची घोडदौड सुरू असून, वंचितशिवाय कोणाचीच सत्ता बसणार नाही," असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    ​आयोजित पत्रकार परिषदेला अपक्ष उमेदवार प्रशांत नक्षणे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, तालुका महासचिव आशिष पाझारे, बंटी तामगाडगे आणि नीरज मोडक प्रामुख्याने उपस्थित होते.

    Photo