ठळक बातम्या

    जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली विधानभवनाला भेट आमदार संजय देरकर यांनी विद्यार्थ्यांना घडवली विधानभवनाची सैर ढाकोरी येथील विद्यार्थी पोहोचले थेट विधानभवनात..

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी: तालुक्यातील ढाकोरी (बोरी) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधानभवनाला भेट दिली. ही शैक्षणिक सैर आमदार संजय देरकर यांनी घडवून आणली. यावेळी आमदारांनी विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. 

    रविवारी दिनांक १४ डिसेंबर रोजी ढाकोरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विधानभवनाला भेट दिली. विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया, विधिमंडळाचे कामकाज, कायदेनिर्मितीची प्रक्रिया आणि लोकप्रतिनिधींची भूमिका याबद्दल प्रत्यक्ष अनुभव घेता आला. विधानभवनाच्या भव्य हॉलमध्ये उभे राहून विद्यार्थी थक्क झाले, तर आमदार देरकर यांनी सांगितलेली विधेयक मांडण्याची प्रक्रिया, चर्चा आणि मतदान याबद्दलची माहिती ऐकताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चमक उमटली. 

    एका विद्यार्थिनीने सांगितले की आम्ही टीव्हीवर हे कामकाज पाहतो, पण प्रत्यक्ष येथे येऊन आमदार कसे बोलतात, कायदे कसे बनतात हे पाहून खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया दिली. तर शिक्षकांनीही ही भेट शैक्षणिकदृष्ट्या अमूल्य असल्याचे सांगितले. आमदार देरकर विद्यार्थ्यांच्या उत्साहाने प्रभावित झाले. 

    "विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहेत. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून ती समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांमध्ये भविष्यातील नेते, अधिकारी, समाजसेवक दडलेले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही विधानभवनाचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे, लोकशाहीची जाणीव व्हावी, या हेतूने मी हा उपक्रम राबविला.– आ. संजय देरकर

    ग्रामपंचायत ढाकोरीच्या सहकार्यातून ही शैक्षणिक सहल घडवण्यात आली. या सहलीत २० विद्यार्थी,  मुख्याध्यापक देवानंद निकुंबे, शिक्षिका  वैशाली चतुर, माधुरी कावडे, शिक्षक कुणाल पवार, शाळा सुधारक समिती अध्यक्ष सतीश मुसळे, सरपंच अजय कवरासे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी घेतलेला हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरला.

    Photo