ठळक बातम्या

    श्री समर्थांची गणेश वंदना आणि हितोपदेश चे प्रकाशन.

     डॉ. स्वानंद पुंड यांची ग्रंथसंख्या ९०


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

              वणी : पुणे येथील विश्वविख्यात प्रसाद प्रकाशनाच्या द्वारे विद्यावाचस्पती  प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या हितोपदेश तृतीय विग्रह प्रकरण आणि श्री समर्थांची गणेश वंदना या दोन ग्रंथांचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले. 

            संस्कृत साहित्यातील कथाविश्वामध्ये अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या नारायण पंडित विरचित हितोपदेश या ग्रंथावर प्रकाशित होत असलेल्या चार ग्रंथांच्या मालिकेतील हा तिसरा ग्रंथ. विग्रह म्हणजे युद्ध. पशुपक्ष्यांच्या कथांच्या माध्यमातून मानवी जीवनाच्या उन्नतीचा राजमार्ग प्रशस्त करणाऱ्या या ग्रंथातील हंसांचा राजा हिरण्यगर्भ आणि मयूरराज चित्रवर्ण यांच्या संघर्षाच्या निमित्ताने विविध कथांच्या माध्यमातून या प्रकरणांची निर्मिती झाली आहे. 

               युद्धाची मानसिकता, युद्ध पूर्व तयारी, संरक्षणाचे महत्त्व, गुप्तहेरांचे गुण, राजाची कर्तव्ये, सैनिकांची राजनिष्ठा अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुणांना येथे विविध पद्धतीने अधोरेखित केले आहे. 

              श्री समर्थांची गणेश वंदना या ग्रंथात सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी मनोबोध, दासबोध, आत्माराम या विविध ग्रंथात केलेल्या गणेश स्तवनाचे तथा श्री समर्थ रचित आरती आणि श्री समर्थांनी दिलेल्या गणेशोत्सवाचे विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. 

               श्री ज्ञानदेवांची गणेश वंदना यानंतर श्री समर्थांची गणेश वंदना या ग्रंथातून समस्त संत मंडळी भगवान श्री गणेशांच्या परब्रह्म परमात्मा स्वरूपाचेच वर्णन कसे करतात ? हे सोदाहरण समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरेल.

                  या दोन ग्रंथांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या प्रकाशित ग्रंथाची संख्या ९० झाली असून मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी देखील त्यांचे एकाच वर्षात दहा ग्रंथ प्रकाशित झाले आहेत हे विशेष उल्लेखनीय.

               संस्कृत आणि संस्कृती प्रेमी जणांनी या दोन्ही ग्रंथांचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन प्रसाद प्रकाशनाच्या वतीने डॉ. उमाताई बोडस यांनी केले आहे.

    हितोपदेश विग्रह प्रकरण 

    पृष्ठ संख्या १२१ मूल्य रू. १५०

    श्री समर्थांची गणेश वंदना 

    पृष्ठ ५६ मूल्य रू. ७०

    प्रसाद प्रकाशन पुणे 

    8446037890

    Photo