विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी :- मेंढोली ते पिंपरी (कायर) या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या बांधकामाचा प्रश्न तब्बल सहा वर्षांपासून प्रलंबित असून, प्रशासनाच्या दिरंगाई व हलगर्जीपणाविरोधात आता नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. जंगल परिसरातील अपूर्ण ६०० मीटर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज काळे यांनी ग्रामस्थ, शेतकरी व नागरिकांसह ३ एप्रिल, गुड फ्रायडेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
मेंढोली ते पिंपरी (कायर) या सुमारे ४ किलोमीटरच्या रस्त्यास २०१८-१९ मध्ये शासनाची मंजुरी मिळाली होती. खनिज विकास निधीतून ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, वणी यांच्या मार्फत ठेकेदार वैभव जिद्देवार यांना काम देण्यात आले आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. मात्र वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या ६०० मीटर रस्त्याच्या कामावरच अडथळे उभे राहिले.
वनविभागाने २०२० मध्ये त्रुटी दर्शवणारे पत्र दिल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक पूर्तता केली नाही. परिणामी मंजूर निधी परत गेला आणि जंगलातील रस्ता आजही अपूर्ण अवस्थेतच आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाकडून “काम पूर्ण झाले, निधी खर्च झाला” असा दावा केला जात असल्याने संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे.
“फक्त माती कामासाठी ५० लाख खर्च होणे शक्य नाही, या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे,” असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. अपूर्ण रस्ता, परत गेलेला निधी आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे संतप्त नागरिकांनी आता थेट आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
वन परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी व नागरिक सहभागी झाले असून, “रस्ता पूर्ण झाला पाहिजे, अन्यथा आंदोलन तीव्र होईल,” असा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, की हा रस्ता अजूनही फाईलमध्येच अडकून राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






