बेसा भीषण अग्नितांडव : गोठ्याला लागलेल्या आगीत आठ निष्पाप शेळ्या होरपळून मृत्यूमुखी
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : 30 मे 2026 : तालुक्यातील बेसा येथे शनिवारी दुपारी घडलेल्या भीषण आग दुर्घटनेत शेतकरी श्री. दत्तू गोहोकर यांच्या गोठ्याला अचानक आग लागून आठ शेळ्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 30 मे रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास गोहोकर यांच्या गोठ्यात अचानक आग भडकली. भर दुपारच्या उकाड्यात काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांना बाहेर काढण्यापूर्वीच ज्वाळांनी संपूर्ण गोठ्याला वेढा घातल्याने आठ शेळ्या जिवंत जळून मृत्युमुखी पडल्या.
आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या घटनेत गोठ्यासह पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या दुर्घटनेमुळे गोहोकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

