विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : दि. १८ जुलै : वणी शहरात अमली पदार्थांच्या विक्री व सेवनावर आळा घालण्यासाठी वणी पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत ३७० ग्रॅम गांजासह एका युवकाला अटक केली. आरोपीकडून गांजा, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण २८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील एकतानगर परिसरातील नगरपरिषद कॉम्प्लेक्सजवळ सापळा रचला. यावेळी सुजल मंगेश गोहोकार (वय २०, रा. एकतानगर, वणी) हा गांजा बाळगून विक्रीसाठी थांबल्याचे निदर्शनास आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ३७० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला.
या कारवाईदरम्यान आरोपीकडील गांजा, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल असा एकूण २८,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रोबिन बनसल (पांढरकवडा विभाग, प्रभारी वणी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात डी.बी. पथक प्रमुख पोउनि. सय्यद साजिद, पोलीस हवालदार गजानन सावसाकडे, श्याम राठोड, पोलीस अंमलदार गणेश मेश्रराम, नंदकुमार पुष्पलवार, मनोश्वर खंडरे, रितेश भोयर व चालक शुभम किनाके यांनी पार पाडली.
