ठळक बातम्या

    टाकळी येथे वीज कोसळून मेंढपाळाचा मृत्यू; १२ ते १३ बकऱ्याही दगावल्या

     


    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

    वणी :  दि. १२ जून : तालुक्यातील टाकळी येथे शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास वीज कोसळून एका मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत त्यांच्यासोबत असलेल्या १२ ते १३ बकऱ्यांचाही जागीच मृत्यू झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी येथील विलास मानकु तुमराम हे मेंढपाळ आपल्या बकऱ्या चारण्यासाठी शेतशिवारात गेले होते. यावेळी परिसरात अचानक पावसासह वादळी वातावरण निर्माण झाले. दरम्यान, त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेत जवळच असलेल्या १२ ते १३ बकऱ्याही मृत्युमुखी पडल्या.

    घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे टाकळी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित प्रशासनाने पंचनामा करून मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

    या नैसर्गिक आपत्तीमुळे मेंढपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

    Photo