विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध वरळी मटका जुगार व्यवसायावर वणी पोलिसांनी शनिवारी (दि. १३ जून) मोठा घाव घालत एकाच दिवशी तब्बल सहा ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईमुळे जुगार व्यवसाय चालविणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून शहरातील मटका अड्ड्यांवर काही काळासाठी शांतता पसरली आहे.
पोलिसांनी सिंधी कॉलनी, एकता नगर, ब्राम्हणी फाटा, दीपक चौपाटी जत्रा मैदान, नगर परिषद परिसर व भाजी मंडी अशा विविध भागांमध्ये एकाच वेळी छापे टाकत १२ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. या कारवाईत रोख रक्कम, मटका पट्ट्या, कार्बन पेपर, पेन आदी साहित्य जप्त करण्यात आले.
सिंधी कॉलनीतील मनोहर बारसमोर आसिद खान आमीर खान पठाण व हरीष सुरेश कापसे हे वरळी मटका चालविताना रंगेहात पकडले गेले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व मटका साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर एकता नगर येथील नगर परिषद कॉम्प्लेक्सजवळ दायाराम फत्ते यादव व सय्यद अलताफ सय्यद रजाक यांच्यावर कारवाई करण्यात आली.
ब्राम्हणी फाटा चौकातील रिलॅक्स बारसमोर अक्षय जगन दुपारे हा मटका लिहिताना पकडला गेला. चौकशीत त्याने शेख इकबाल शेख हुसेन याच्यासाठी काम करत असल्याची माहिती दिली. दीपक चौपाटी परिसरात शंकर गणपत धंदरे याला ताब्यात घेण्यात आले, तर त्याचा साथीदार आसिद खान मेहबूब खान हा फरार झाला.
नगर परिषदेजवळील ज्योती बार गल्लीत सय्यद शेरु सय्यद ताज व मंगेश शंकर शेंद्रे यांच्याकडून मटका साहित्य जप्त करण्यात आले. तसेच भाजी मंडी परिसरात सोहेल खान अकबर खान याला अटक करण्यात आली असून बबलू उर्फ सय्यद जाफर सय्यद ननू हा आरोपी पोलिसांना चकवा देत फरार झाला.
सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) सह इतर संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचा पुढील तपास वणी पोलीस करीत असून शहरातील अवैध जुगार व्यवसाय पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी अशाच धडक कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ‘पुढचा नंबर कुणाचा?’ अशी चर्चा सध्या वणी शहरात रंगू लागली आहे.



