ठळक बातम्या

    शिरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; देशी कट्ट्यासह आरोपी जेरबंद, ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी/शिरपूर : यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला शिरपूर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. पोलिसांच्या सतर्कता, गुप्त माहिती संकलन आणि तत्पर कारवाईमुळे देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसणार असून नागरिकांमध्ये शिरपूर पोलिसांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

    पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रास्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांनी आपल्या पथकाला सतर्क राहून प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

    दि. १३ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजताच्या सुमारास शाहरुख गुलशेर खान (वय ३१, रा. आमराई वॉर्ड क्र. २, घुग्घुस, जि. चंद्रपूर) हा मुंगोली खदान परिसरात संशयास्पद हालचाली करत देशी कट्टा बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. माहितीची शहानिशा करून पोलिसांनी मुंगोली ते वर्धा नदी पुलाजवळ सापळा रचला.

    पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्या कमरेला खोचलेला गावठी बनावटीचा देशी कट्टा (किंमत ५० हजार रुपये) तसेच दोन जिवंत काडतुसे (किंमत २ हजार रुपये) आढळून आली. पोलिसांनी तत्काळ ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली.

    या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ व १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

    ही उल्लेखनीय कारवाई ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पोहेकॉ सुनिल दुबे, पोहवा अविनाश बानकर, पोहवा इकबाल शेख, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुडमेथे, दीपक वाकडे, किरण दासरवार आणि प्रफुल नाईक यांनी यशस्वीरित्या पार पाडली. शिरपूर पोलिसांच्या या धाडसी आणि प्रभावी कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचा संदेश गुन्हेगारांपर्यंत पोहोचला आहे.




    Photo