विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी/येनक : येनक हनुमान नगर परिसरातील पाण्याची टाकी अत्यंत धोकादायक अवस्थेत असून ती तात्काळ तोडून हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समितीकडे केली आहे. टाकीच्या भिंतींना मोठे तडे गेले असून आतील लोखंडी सळया गंजल्याने संपूर्ण संरचना कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ही टाकी कधीही कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच परिसरातील घरे, वाहने आणि इतर मालमत्तेचेही मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
येनक हनुमान नगरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागामार्फत टाकीची पाहणी करावी व ती धोकादायक असल्याचे घोषित करून लवकरात लवकर पाडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी विलंब न करता तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले असून, कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


