विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : यवतमाळ जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत वणी शहरातील दोन तरुणांना MD (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थासह ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण १ लाख ६३ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ विक्री व सेवन होऊ नये, तसेच अवैध धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी व स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी (१४ जून) वणी शहरात सापळा रचला.
SPM शाळेच्या मागील बाजूस, नगर परिषद शाळा क्रमांक ३ समोरील मोकळ्या मैदानात दोन इसम MD ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला. यावेळी सौरभ दिनेश खैरे (वय २५, रा. तेली फैल, वणी) आणि प्रथमेश विनोद गुंडेवार (वय २०, रा. भाग्यशाली नगर, वणी) हे संशयित त्यांच्या दुचाकीजवळ आढळून आले.
त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ५ ग्रॅम ९१ मिलीग्रॅम MD ड्रग्स (किंमत ४१,३७० रुपये) आढळून आले. याशिवाय रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण १,६३,०७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, श्री. सतीश चव्हरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सतीश चव्हरे, वणीचे पोलीस निरीक्षक श्री. भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
युवा पिढीसाठी संदेश :
अमली पदार्थ हे केवळ व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे विष आहे. क्षणिक आनंदाच्या मोहात पडून तरुणांनी नशेच्या आहारी जाऊ नये. शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळून व्यसनमुक्त व सुदृढ समाज घडविण्यासाठी प्रत्येक युवकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.


