ठळक बातम्या

    यवतमाळ जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन पिकांचा विमा हप्ता कमी करा; विजय पिदुरकर यांची आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे मागणी

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : खरीप हंगाम २०२६ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन पिकांवर निश्चित करण्यात आलेला विमा हप्ता इतर समकक्ष जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने तो कमी करण्यात यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यवतमाळ जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, हवामान, पर्जन्यमान आणि नैसर्गिक आपत्तींचा धोका हा वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यांप्रमाणेच असतानाही यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी विमा हप्ता लक्षणीयरीत्या अधिक आकारण्यात आला आहे.

    यवतमाळ जिल्ह्यात कापसासाठी प्रतिहेक्टर सुमारे १२५० रुपये आणि सोयाबीनसाठी ९६० रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आला असून, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा हप्ता अधिक असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी इतर जिल्ह्यांप्रमाणेच विमा हप्ता कमी करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती विजय पिदुरकर यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना केली आहे. निवेदनाची प्रत राज्याचे कृषिमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे.

    Photo