ठळक बातम्या

    राजूर-चिखलागाव परिसरातील शेकडो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना

     *प्रवीणभाऊ खानझोडे   व लढा संघटना च्या वतीने वाहन चालक व वारकरी भाविक यांचा स्वागत करण्यात आले..*


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राजूर-चिखलागाव परिसरातील शेकडो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भक्तिभावाने पंढरपूरकडे रवाना झाले. "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

    यावेळी  खानझोडे कुटुंबातर्फे सर्व वारकरी बांधव व त्यांना घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांचे शाल व श्रीफळ देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांना व शुभेच्छा देत त्यांच्या सुखरूप, मंगलमय आणि यशस्वी पंढरपूर वारीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

    वारकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा, डोक्यावर तुळशीवृंदावन आणि भगवे ध्वज घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी प्रस्थान केले. या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांच्या सेवाभावाला सलाम केला.

    वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची परंपरा आजही भक्ती, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देत समाजाला प्रेरणा देत आहे. विठ्ठलनामाच्या गजरात निघालेल्या या वारकऱ्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

    "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकाराम!" या अखंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि प्रत्येकाच्या मुखी विठ्ठलनामाचा गजर ऐकायला मिळाला.

    खानझोडे कुटुंबातर्फे सर्व वारकरी व वाहन चालकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील प्रवासासाठी मंगलमय शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी शिवाजी मोरे आकाश दुबे श्रीकांत कालर उपस्थित होते

    Photo