ठळक बातम्या

    कर्णकर्कश वाद्ययंत्रांचा वापर केल्यास कठोर कारवाई; वणी पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांचा गणेश मंडळांना इशारा

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी वणी पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. गणेशोत्सवात कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्या तसेच ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दिला आहे.

    गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, या उत्सवाच्या नावाखाली नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक, डीजे किंवा इतर कर्णकर्कश वाद्ययंत्रांचा वापर केल्यास पोलिस प्रशासनाकडून कोणतीही हयगय केली जाणार नाही, असे पोलीस निरीक्षक पिदूरकर यांनी स्पष्ट केले.

    गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवावा तसेच शासनाने व न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

    नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

    गणेशोत्सवात शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी वणी पोलिस प्रशासन सतर्क आहे. ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल. कर्णकर्कश वाद्ययंत्रांचा वापर करून नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दिला.

    गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि भक्तिमय वातावरणात साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

    Photo