मित्रमैत्रिणींची संगत, सोशल दबाव आणि पालकांचे दुर्लक्ष किती धोकादायक? आई-वडिलांनो, मुलांच्या हालचालींकडे लक्ष द्या!
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना एका खोलीत नेऊन मद्यपान करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार वणी शहरात समोर आला आहे. सुदैवाने या प्रकरणात कोणताही मोठा अनर्थ घडला नसल्याचे समोर आले असले, तरी या घटनेने अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा आणि चुकीच्या संगतीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
वणी शहरातील १६ वर्षीय विद्यार्थिनी २७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या मैत्रिणीसोबत झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडली होती. संबंधित दुकान बंद असल्याने त्या दुसरीकडे जात असताना मैत्रिणीच्या नातेवाईक असलेल्या एका तरुणीचा फोन आला. “मोमोज खायला जाऊ” असे सांगून तिने दोघींना बोलावून घेतले.
मात्र, त्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये न नेता एका भाड्याच्या खोलीत नेण्यात आले. तेथे संबंधित तरुणीचा प्रियकर आणि त्याचा मित्र मद्याच्या बाटल्या घेऊन आले. दोन्ही अल्पवयीन मुलींवर मद्यपान करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे त्यांच्या जबाबातून समोर आले आहे.
मुलींनी सुरुवातीला नकार दिल्यानंतरही “तुमच्यावर पैसे खर्च केले आहेत, एवढे तरी प्यावे लागेल” अशा प्रकारे मानसिक दबाव आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एका विद्यार्थिनीच्या नकळत तिच्या ग्लासमध्ये बिअर मिसळण्यात आल्याने तिला मद्याचा परिणाम झाला आणि काही काळ तिचे भान हरपल्यासारखी अवस्था झाली.
दरम्यान, शुद्धीवर आल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने आपल्यासोबत कोणताही शारीरिक अत्याचार किंवा गैरप्रकार झाला नसल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच कोणावरही कारवाई नको असल्याचेही तिने नमूद केले आहे.
मात्र, या घटनेकडे केवळ “काही घडले नाही” म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. अल्पवयीन मुलींना त्यांच्या इच्छेविरुद्ध मद्यपान करण्यास भाग पाडणे, त्यांना घराबाहेर बोलावून वेगळ्या ठिकाणी नेणे आणि त्यांच्यावर मानसिक दबाव आणणे ही बाब पालकांसह समाजासाठी गंभीर इशारा आहे.
आई-वडिलांसाठी महत्त्वाचा संदेश
मुलांना फक्त मोबाईल, शिक्षण आणि पैशांवर लक्ष ठेवून सुरक्षित ठेवता येत नाही. त्यांच्या मित्रमैत्रिणी कोण आहेत, ते कुठे जातात, कोणाच्या संपर्कात आहेत आणि सोशल मीडियावर कोणाशी संवाद साधतात, याचीही पालकांनी प्रेमाने माहिती घेतली पाहिजे.
मुलांवर सतत संशय घेण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीचे नाते निर्माण करा. कोणत्याही अडचणीत किंवा दबावाच्या परिस्थितीत ते सर्वप्रथम आई-वडिलांशी बोलतील, असा विश्वास निर्माण करणे हीच खरी सुरक्षितता आहे.
“मुलांनी चूक करू नये” एवढेच नाही; तर चूक, दबाव किंवा धोका जाणवला तर त्यांनी घाबरून न जाता पालकांना सांगावे, हे अधिक महत्त्वाचे आहे.
वणीतील ही घटना पालकांसाठी धोक्याची घंटा ठरली असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंब, शाळा आणि समाजाने अधिक सजग होण्याची गरज आहे.
