ठळक बातम्या

    आरक्षणासाठी धोबी-परीट समाजाचा एल्गार! नागपुरातील उपोषणाचा चौथा दिवस; शासनाच्या निर्णयाकडे समाजबांधवांचे लक्ष

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    नागपूर : नवीन आरक्षणाची मागणी करण्याऐवजी धोबी-परीट समाजाला पूर्वीपासून उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या सवलती व सुविधांचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी धोबी-परीट समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषण व साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. संविधान चौक, नागपूर येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला समाजबांधवांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.

    समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली आहे. केवळ आश्वासन नको, तर शासनाने ठोस निर्णय घेऊन समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

    आरक्षण समन्वय समितीचे प्रमुख आशिष कदम, अध्यक्ष डी. डी. सोनटक्के, कार्याध्यक्ष राजेंद्र खैरनार, तसेच सुधीर खैरनार, मुरलीधर शिंदे, संतोष सावतीरकर, राहुल वरणकर यांच्यासह समाजबांधव आंदोलनात सक्रिय सहभागी झाले आहेत.

    हे आहेत प्रमुख उपोषणकर्ते

    या उपोषण व साखळी उपोषणात जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले महाबळेश्वरचे बळवंतराव साळुंखे, बीडचे ज्योतिबा नन्नवरे, बुलडाणा जिल्ह्यातील खामगावचे शंकर परदेशी, चंद्रपूरचे मनोहर चिंचोलकर आणि नांदेडचे संतोष औढेकर हे प्रमुख उपोषणकर्ते सहभागी झाले आहेत.

    आरक्षण समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात समाजाच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि प्रलंबित प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

    समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

    धोबी-परीट समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला बळ देण्यासाठी राज्यातील धोबी समाजबांधवांनी एकजुटीने पुढे येऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आरक्षण समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

    “हक्कासाठी एकजूट, मागण्यांसाठी संघर्ष आणि न्याय मिळेपर्यंत लढा” या भूमिकेतून आंदोलन सुरू असून, आता शासन या आंदोलनाची दखल घेऊन कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.



    Photo