विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : दि. १२ जून : प्रभाग क्रमांक ०९ मधील तीव्र पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा आणि प्रशासनाच्या कथित दुर्लक्षाविरोधात शुक्रवारी सकाळी नागरिकांचा संताप अनावर झाला. नगरसेवक शत्रुघ्न मालेकर, सुधीर थेरे, अब्दुल हाफीज सत्तार/ टापू तसेच नगरसेविका किरण देरकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० ते १५० महिला व पुरुषांनी वणी नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला.
मोर्चेकऱ्यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी (सीओ), जलपुरवठा अभियंता आणि पाणीपुरवठा ठेकेदार यांच्यासमोर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. "आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नाही, आले तरी अवघा अर्धा ते एक तासच पाणीपुरवठा होतो, तेही घाण आणि दूषित पाणी असते. काही घरांपर्यंत तर पाणी पोहोचतच नाही," असा संतप्त सूर नागरिकांनी लावला.
यावेळी जलपुरवठा विभागाचे अधिकारी आणि पाणीपुरवठा ठेकेदार यांच्याविरोधात नागरिकांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. विरोधी पक्ष नेते सुधीर थेरे व अध्यक्ष यांच्यात आक्रमक पणा दिसून आल्या.नगसेवक राजु भोंगळे,अजय धोबे यांनी ही जलपुर्ती विभागा कडून घडत असलेल्या चुका मुळे पाण्याच्या टंचाईचा जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे जनतेत आक्रोश निर्माण होत आहे. नागरिकांच्या संतापामुळे नगरपरिषद परिसरात एकच खळबळ उडाली.
मात्र नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी संयमाने नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच शनिवार, दि. १३ जून रोजी प्रभाग क्रमांक ०९ मधील पाणीपुरवठ्याची स्वतः पाहणी करून समस्या सोडविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले. यानंतर मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यात आले.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
अनेक भागात नियमित पाणीपुरवठा होत नाही.
नळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच पाणी बंद होते.
दूषित व घाण पाणी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चार-चार दिवसांनीच पाणीपुरवठा केला जातो.
वारंवार विविध कारणे सांगून पाणीपुरवठा खंडित केला जातो.
पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने मोठ्या अडचणी निर्माण होतात.
ज्या भागात नळ सुविधा नाही, तेथे तातडीने व्यवस्था करावी.
पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे.
नवीन नळ कनेक्शन त्वरित देण्यात यावेत.
काही भागात अद्याप पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही.
मंजूर नळ जोडण्यांची टाकीपर्यंत जोडणी करण्यात आलेली नाही.
नागरिकांनी निवेदनाद्वारे स्पष्ट इशारा दिला की, प्रभाग क्रमांक ०९ मधील पाणीपुरवठ्याच्या समस्या तात्काळ सोडवून नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
प्रभागातील नागरिकांच्या संतापामुळे वणीतील पाणीपुरवठा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







