ठळक बातम्या

    चारगाव फाट्याजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, मुलगी बचावली

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी , शिरपूर: गडचांदूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बस आणि दुचाकीमध्ये चारगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात त्यांच्यासोबत असलेली लहान मुलगी सुदैवाने बचावल्याने मोठा अनर्थ टळला.

    मृत व्यक्तीचे नाव रवींद्र बाबाराव मालेकर (वय ५०, रा. शेलू) असे आहे. प्राप्त माहितीनुसार, रवींद्र मालेकर हे आपल्या लहान मुलीसह दुचाकीवरून प्रवास करीत होते. दरम्यान, कोरपना मार्गाकडून येणाऱ्या एसटी बससोबत त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, बसच्या मागील चाकाखाली आल्याने रवींद्र मालेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

    या दुर्घटनेत त्यांच्यासोबत असलेली लहान मुलगी थोडक्यात बचावली असून तिला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
    पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविलाअसून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

    या अपघाती मृत्यूमुळे शेलू गावासह परिसरात शोककळा पसरली असून रवींद्र मालेकर यांच्या निधनाबद्दल नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



    Photo