ठळक बातम्या

    साने गुरुजींची ७६ वी पुण्यतिथी नगर वाचनालय वणी येथे भावपूर्ण वातावरणात साजरी; साहित्य व विचारांना अभिवादन

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : ज्येष्ठ साहित्यिक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजी यांच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (११ जून) येथील नगर वाचनालयात भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली.

    नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ शाखा वणी तसेच साने गुरुजींच्या विचारांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमात नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी साने गुरुजींच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या साहित्य, समाजसेवा आणि राष्ट्रप्रेमाच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

    ममता, करुणा, मानवता आणि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या साने गुरुजींच्या विचारांची आजही समाजाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘श्यामची आई’ या अजरामर साहित्यकृतीमुळे साने गुरुजी घराघरांत पोहोचले असून, हे पुस्तक मराठी साहित्यातील अमूल्य ठेवा मानले जाते. त्यांच्या साहित्याने अनेक पिढ्यांना संस्कार, प्रेरणा आणि सामाजिक जाणीव दिली असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे सचिव प्रा. अभिजित अणे यांनी केले. याप्रसंगी प्रा. स्वानंद पुंड, हरिहर भागवत, अशोक सोनटक्के, राजेश महाकुलकर, स्नेहलता चुंबळे, अरुण कावडकर, गजानन भगत, राजू धावंजेवार, लता पांडे, सुनील इंदुवामन ठाकरे, जयंत लिडबिडे, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, कल्पना राठोड यांच्यासह अनेक मान्यवर व साहित्यप्रेमी उपस्थित होते.




    Photo