विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

वणी : वणी तालुक्यातील वेकोलीच्या कोळसा खाण प्रकल्पग्रस्त भागातील स्थानिक बेरोजगार युवकांना शासनाच्या धोरणानुसार ८० टक्के रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, वणी परिसरातील मुंगोली, बेलोरा, पिंपळगाव, कोलार पिंपरी, जुनाड, भांडेवाडा आदी गावांमध्ये वेकोली आणि कंत्राटी कंपन्यांमार्फत कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे. खाण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या असल्या तरी अनेक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त युवकांना अपेक्षित रोजगार मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

वेकोलीच्या कामकाजामुळे परिसरातील पर्यावरण, शेती आणि उपजीविकेवर परिणाम होत असून स्थानिक नागरिकांच्या जीवनमानावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत प्रकल्पग्रस्त कुटुंबांतील युवकांना रोजगार मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पिदुरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात शासनाच्या रोजगारविषयक धोरणानुसार खाण प्रकल्पांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देऊन किमान ८० टक्के रोजगार देण्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित कंपन्यांनी कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन युवकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच खाण प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या गावांतील बेरोजगारांची माहिती संकलित करून रोजगार कृती आराखडा तयार करावा आणि स्थानिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

स्थानिक युवकांना रोजगार न मिळाल्यास भविष्यात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.