ठळक बातम्या

    एकार्जुना येथे शेतकऱ्यावर वीज कोसळून मृत्यू; नितीन डुडुरे यांचा दुर्दैवी अंत

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वरोरा : वरोरा तालुक्यातील एकार्जुना गावात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण दुर्घटनेत एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. नितीन चंद्रशेखर डुडुरे (वय ४०, रा. एकार्जुना) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नितीन डुडुरे हे दुपारी शेतीची कामे करण्यासाठी आपल्या शेतात गेले होते. सायंकाळी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी शेतातील एका झाडाचा आधार घेतला. मात्र त्याच वेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या भीषण घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या दुर्दैवी घटनेमुळे एकार्जुना गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

    दरम्यान, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी वादळी पाऊस व विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

    विजांच्या कडकडाटाच्या वेळी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

    - हवामान खराब होत असल्याचे दिसताच शेतातील कामे त्वरित थांबवावीत.

    - झाडाखाली, विद्युत खांबाजवळ किंवा उंच ठिकाणी उभे राहू नये.

    - मोबाईल, लोखंडी अवजारे, ट्रॅक्टर किंवा इतर धातूच्या वस्तूंपासून दूर राहावे.

    - सुरक्षित इमारत किंवा पक्क्या घरात आश्रय घ्यावा.

    - मोकळ्या शेतात अडकले असल्यास दोन्ही पाय एकत्र ठेवून खाली बसावे, पण जमिनीवर आडवे पडू नये.

     - हवामान खात्याच्या सूचना व वीज पडण्याच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेवावे.

    - पाऊस व वीज सुरू असताना शेतीतील मोटार, पंप किंवा विद्युत उपकरणांना हात लावू नये.


    "सावध राहा, सुरक्षित राहा" — विजांच्या कडकडाटाकडे दुर्लक्ष केल्यास जीवितहानी होऊ शकते.

    Photo