विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
घुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस येथील वर्धा नदी घाट परिसरात पाच युवक बुडाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी घराबाहेर फिरण्यासाठी गेलेले पाच युवक रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचा शोध सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घुस येथील इंदिरानगर परिसरातील तनमय नवनाथ पठाडे (वय 18) हा आपल्या चार मित्रांसह सोमवारी दुपारी घरातून बाहेर पडला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत ते सर्व घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधमोहीम सुरू केली.
शोधादरम्यान वर्धा नदीलगत असलेल्या डब्ल्यूसीएल पाणी टाकी परिसरात नदीकाठावरील वाळूत पाचही युवकांचे कपडे, चप्पल-बूट आणि मोबाईल फोन संशयास्पद अवस्थेत आढळून आले. यानंतर घटनेची माहिती तत्काळ घुग्घुस पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तसेच मंगळवारी सकाळी चंद्रपूर येथून विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बचावकार्यादरम्यान सकाळी सुमारे ७.३० वाजता डब्ल्यूसीएल पाणी टाकी परिसरालगत वर्धा नदीत तरंगत असलेला तनमय नवनाथ पठाडे याचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, उर्वरित चार युवकांचा शोध घेण्यासाठी नदीत व्यापक शोधमोहीम राबविण्यात येत असून पोलीस आणि बचाव पथकाकडून युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे घुग्घुस परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून हरवलेल्या अन्य युवकांबाबतची अधिकृत माहिती आणि तपशील तपास पूर्ण झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहेत.

