विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे नवविवाहित पती-पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. लग्नाला अवघा एक महिना उलटला असताना घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करिश्मा धानोरकर आणि आशीष धानोरकर यांचा विवाह ४ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या दाम्पत्याने इतके टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.
रविवारी (दि. ८ जून) रात्री सुमारे ८.३० वाजता दोघेही मोटारसायकलने घराबाहेर पडले. त्यानंतर गावालगतच्या शेतातील एका विहिरीत त्यांचे मृतदेह आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार, दोघांनी आपल्या पोटाला दोरीने दगड बांधून विहिरीत उडी घेतल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार शाम वानखेडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करीत आहेत. नवविवाहित दाम्पत्याच्या अकाली निधनामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सगणापूर गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
तपास सुरू
या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण समोर येणार आहे.

