ठळक बातम्या

    मुंगोली विस्तार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या; विजय पिदुरकर यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : मुंगोली विस्तार प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

    निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुंगोली विस्तारीकरण प्रकल्पासाठी मुंगोली येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. मात्र, आजही अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंगोली गावाचे पुनर्वसन सुमारे 12 किलोमीटर अंतरावरील कुर्ली शिवारात करण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या शेतीजमिनी मात्र मूळ गावाच्या परिसरातच आहेत. त्यामुळे शेतीची मशागत, पेरणी, कापणी तसेच शेती अवजारे घेऊन दररोज 12 किलोमीटरचा प्रवास करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कष्टदायक ठरत आहे.

    तसेच, पुनर्वसित गावातील श्रीमती कांताबाई पिंपळशेंडे व श्री दशरथ भोसकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना वेकोलीच्या मुंगोली उपक्षेत्राकडून 2015 मध्ये लेखी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, तब्बल दहा वर्षे उलटूनही त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

    विजय पिदुरकर यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, वेकोलीकडून शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

    प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने विचार करून लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.




    Photo