विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : तालुक्यातील मंदर येथे वडिलोपार्जित जागेच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये झालेल्या भांडणाला रक्तरंजित वळण मिळाले. लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवार, २१ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोष बुरडकर यांचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान रात्री सुमारे १२ वाजता मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बुरडकर आणि त्यांचे भाऊ रविंद्र बुरडकर यांच्यात वडिलोपार्जित जागेवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद मिटविण्यासाठी गावातील तंटामुक्ती समितीनेही दोन्ही भावांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वाद कायम राहिला.
सोमवारी रात्री याच कारणावरून दोन्ही भावांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रविंद्र याने संतोष यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचे सांगण्यात येते. या झटापटीत चाकूचा वार संतोष यांच्या मांडीवर झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले.
रक्तबंबाळ अवस्थेत संतोष यांना उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मंदर गावात खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. संपत्तीच्या वादातून सख्ख्या भावाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आरोपी रविंद्र बुरडकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत.
