विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक गुरुवारी (ता.१७ सप्टेंबर) जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केल जात आहे. मात्र, यावर्षी सप्टेंबर महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या काळात होणार आहे. याबाबतची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या आगामी बारावी लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ होणार आहे. तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा ही २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या दरम्यान पार पडणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा ही २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या एकूण नऊ विभागीय शिक्षण मंडळातंर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. या नऊ विभागात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय शिक्षण मंडळांचा समावेश होतो. इयत्ता बारावी अन दहावीच्या परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येत असतो. काही महिने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यापाठीमागं दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्तम तयारी करता यावी हा उद्देश असतो.
विद्यार्थ्यांसाठी संदेश
परीक्षेला अजून वेळ आहे, पण तयारीला आजपासूनच सुरुवात करा!
वेळापत्रक जाहीर झाल्याने अभ्यासाचे नियोजन करण्याची योग्य संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. दररोज ठराविक वेळ अभ्यासासाठी देऊन अवघड विषयांना अधिक वेळ द्या. सातत्यपूर्ण अभ्यास, नियमित सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर परीक्षेला सामोरे जा. तणाव न घेता नियोजनबद्ध तयारी करा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा.

