ठळक बातम्या

    मारेगावात महावितरणची आढावा बैठक; आमदार संजय देरकर यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    मारेगाव: मारेगाव येथे आमदार संजय देरकर यांच्या माध्यमातून महावितरणच्या मारेगाव तालुक्यातील कामांचा आणि वीजविषयक विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत तालुक्यातील शेतकरी, नागरिक तसेच पदाधिकाऱ्यांनी घरगुती आणि कृषी वीजपुरवठ्याशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांवर महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    बैठकीत शेतकऱ्यांनी सोलर कृषी पंपाच्या प्रलंबित अर्जांचा मुद्दा उपस्थित केला. मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी अर्ज केले असून, संबंधित एजन्सीकडून पंप उपलब्ध करून देण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी मांडल्या. शासनाच्या संबंधित नियमांनुसार निर्धारित कालावधीत सोलर पंप उपलब्ध न झाल्यास संबंधित एजन्सीवर दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले. याबाबत आमदार संजय देरकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे थेट विचारणा केली असता, आजपर्यंत कोणत्याही एजन्सीवर अशा प्रकारची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    तसेच, अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी कृषी वीजपंपासाठी डिमांड भरली होती. त्यानंतर कालांतराने कृषी पंपाची प्रक्रिया बंद करून सोलर पंप घेण्यास सांगण्यात आले. मात्र, जुन्या डिमांडची रक्कम अद्याप परत मिळालेली नसल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांनी बैठकीत मांडल्या. या प्रकरणात शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये आणि त्यांच्या रकमेबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, याबाबतही चर्चा करण्यात आली.

    स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक नसल्याचे शासनाकडून सांगितले जाते; मात्र महावितरणकडे इतर प्रकारचे मीटर उपलब्ध नसल्याने ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. याबाबतही अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

    याशिवाय मारेगाव तालुक्यातील घरगुती वीज ग्राहक, शेतकरी, वीजपुरवठा, प्रलंबित जोडण्या, कृषी पंप आणि इतर वीजविषयक समस्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. नागरिकांनी प्रत्यक्षपणे आपले प्रश्न मांडल्याने अनेक प्रलंबित बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या.

    यावेळी आमदार संजय देरकर यांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेऊन प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या समस्या मोठ्या स्वरूपाच्या आहेत, त्या देखील प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, करण्यात आलेल्या कार्यवाहीचा पुढील महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

    या आढावा बैठकीमुळे मारेगाव तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना आपल्या वीजविषयक समस्या थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाच्या पातळीवर पाठपुरावा करण्याचा मार्गही मोकळा झाला.

    यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता पांढरकवडा संजया खंगार, उपअभियंता संतोष लोहे, कनिष्ठ अभियंता निलेश काकडे, कनिष्ठ अभियंता ज्युही वाघमारे, सहाय्यक अभियंता अतुल आत्राम, मारेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मनीष मस्की, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल दरेकर, तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, मारेगाव शहर प्रमुख अभय चौधरी, संपर्कप्रमुख सचिन पचारे, देवा बोबडे  , युवा सेना तालुका प्रमुख करण किंगरे तसेच महावितरणचे अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.



    Photo