ठळक बातम्या

    आज रघुवंशम् एकादश सर्गाचे प्रकाशन. विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड यांचा ९५ वा ग्रंथ

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : लंडन बुक ऑफ रेकॉर्ड विक्रम स्वरूपात नोंदवलेली आणि आणखीन एका विक्रमाच्या उंबरठ्यावर उभी असलेली लेखमालिका म्हणजे रघुवंशम् . आज या मालिकेच्या संकलन स्वरूपात प्रकाशित होत असलेल्या ग्रंथ मालिकेचा ११ वा ग्रंथ प्रकाशित होत आहे.

               दोन महर्षींच्या प्रसंग रूप कोंदणामध्ये सजलेल्या भगवान श्री रामचंद्र आणि देवी सीतेच्या विवाह रुपी रत्नाने नटलेला हा सर्ग. 

              आरंभ होतो तो महर्षी विश्वामित्रांच्या आगमनाने. त्यांनी केलेली  राम-लक्ष्मणांची मागणी, महाराज दशरथांच्या मनातील घालमेल, महर्षी वशिष्ठांनी दिलेले अनुमोदन, शास्त्र संपन्नते सोबत शस्त्र संपन्नतेच्या अनिवार्यतेची त्यातून प्रगटलेली भावना, त्राटिकावधाच्या वेळी महर्षी विश्वामित्रांनी प्रगट केलेली जनकल्याणकारी भूमिका, श्री रामचंद्रांचा प्रथम पराक्रम, अहिल्या उद्धाराच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आलेली कृषी विषयक भूमिका, श्री रामचंद्रांच्या द्वारे भंग पावलेले शिवधनुष्य, श्री सीतारामचंद्र विवाह मंगल, चारही भावंडांचा गृहस्थाश्रम प्रवेश, अयोध्या  परतीच्या मार्गावर आलेले भगवान परशुराम, त्यांचा भीषण संताप, त्या निमित्ताने उलगडलेला त्यांचा इतिहास, त्यांच्याद्वारे श्री रामचंद्रांना दिलेले आव्हान, जणू काही अंतर्गत धर्मद्रोही मी संपविले आता बाहेरच्या रावणाचा समाचार आपण घ्यावा असे म्हणत आपल्या हातातील धनुष्यरुपी सूत्र एका अवताराने दुसऱ्या अवताराला देण्याची लोकविलक्षण घटना, स्वर्गात जाण्यापेक्षा भारतात राहणे स्वीकारणारी भगवान परशुरामांची राष्ट्र आणि धर्मनिष्ठा अशा अनेकानेक वैशिष्ट्यपूर्ण पैलूंनी सजलेला हा सर्ग.

            त्यात अनेक जागी मानवी कल्पनाविश्वाची मर्यादा पार करत वर्णन करणारी महाकवींची दिव्य प्रतिभा, त्राटिकेच्या निमित्ताने प्रगटलेला भयंकर आणि बिभत्स रस, अहिल्या उद्धारातून प्रगटलेला शांत रस, सीता स्वयंवराच्या माध्यमातून प्रगटलेला अलवार शृंगार रस, भगवान परशुरामांच्या निमित्ताने पुन्हा एकदा भयानक तर श्री रामचंद्र यांच्या कृतीतून प्रगटलेला वीररस अशा विविध रसांची एकाच वेळी मेजवानी देणारा हा सर्ग.

           संस्कृत साहित्याच्या अभ्यासकांनी या सुवर्णसंधीचा जरूर लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन. 


    रघुवंशम् सर्ग ११

    विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड 

    अविरत प्रकाशन जळगाव 

    90288 68953

    मूल्य - टपाल खर्चासह केवळ १८० ₹

    Photo