ठळक बातम्या

    राजुरा येथे 'मन की बात' कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण; पंतप्रधान मोदींच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यकर्ते व नागरिक भारावले

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    राजुरा : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १३४ व्या भागाचे सामूहिक प्रक्षेपण रविवार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजुरा येथील जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. राजुरा शहर मंडळांतर्गत बूथ क्रमांक १०६ वरील कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    या प्रसंगी आमदार देवराव भोंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थितांनी एकत्रितपणे ‘मन की बात’ कार्यक्रमाचे श्रवण केले. आपल्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील सामान्य पण असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. कठोर परिश्रम, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्तींच्या कथा त्यांनी देशवासीयांसमोर मांडल्या.

    यावेळी त्यांनी युवा पिढीला आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारून समाजोपयोगी कार्यात योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेचा पुनरुच्चार करत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

    कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी पंतप्रधानांच्या विचारांचे स्वागत करत विविध विषयांवर चर्चा केली. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा प्रेरणादायी संवादांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




    Photo