विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यथोचित वाव मिळावा आणि त्यांना सुयोग्य व्यासपीठ मिळावे या दृष्टीने शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे वर्षभर जे विविध उपक्रम राबविले जातात त्याच्या या शैक्षणिक क्षेत्रातील आरंभ स्वरूपात रंगमंचाची अधिष्ठात्री देवता नटराज पूजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये प्रा. अंजली आत्राम यांनी भगवान नटराजाच्या प्रतिमेमध्ये असणाऱ्या विविध सांकेतिक अर्थांना उलगडून दाखविले. तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांस्कृतिक कौशल्यांचे महत्त्व स्पष्ट केले.
याप्रसंगी जेष्ठ नाट्यकर्मी अशोक सोनटक्के यांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख अतिथी स्वरूपात उपस्थित शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा वणी येथील जेष्ठ नाट्यकर्मी अशोक सोनटक्के यांनी स्वतःच्या नाट्य जीवनाचा आढावा घेत महाविद्यालयात पूर्वीच्या काळी झालेल्या या विषयातील विविध ऐतिहासिक प्रसंगांना उजाळा दिला. जीवनातील परिश्रम आणि सातत्य यांचे महत्त्व सांगून त्यांनी आयुष्यात एक तरी कला अंगी जोपासवी असा सल्ला दिला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ. अभिजित अणे यांनी महाविद्यालयातील याविषयी अशी संबंधित विविध सुविधांचा परिचय करून देत विद्यार्थ्यांनी या संधीचा परिपूर्ण उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी सावरकर आणि आयेषा शेख यांनी तर आभार प्रदर्शन लवकिता देठे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बिलोरिया, पंकज सोनटक्के, कार्तिक देशपांडे, भदुसिंग वडते, मनोज केळकर यांनी विशेष सहकार्य केले. सलोनी डाहुले आणि स्वीटी भोयर यांनी काढलेल्या नटराज्याच्या रांगोळीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.



