यवतमाळ जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांचा समावेश; पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
मुंबई : खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. कृषी आयुक्तांच्या २४ सप्टेंबरच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दुष्काळी परिस्थिती लागू झालेल्या तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि रोजगार हमी योजनेतील कामे वाढविणे अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.
तसेच गरजेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतीपंपांची वीजजोडणी न तोडणे, शेतकरी व शेतमजुरांसाठी अन्नधान्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा, जलसंधारणाची कामे आणि पिण्याचे तसेच पशुधनासाठी पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व १६ तालुके दुष्काळाच्या यादीत
या निर्णयात यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी आणि राळेगाव या तालुक्यांचा समावेश आहे.
पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश
दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, तसेच पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शविणारे छायाचित्र आणि GPS को-ऑर्डिनेट्स संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पीक नुकसानीची प्रत्यक्ष आर्थिक मदत किती मिळणार, याची रक्कम या शासन निर्णयात निश्चित करण्यात आलेली नाही. त्यासाठी पंचनामे व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे.
