ठळक बातम्या

    मानवी जीवनात कथामृताचे पान अनिवार्य - ह.भ.प.माधव बुवा धुमकेकर

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी :   "मानवी जीवनात भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेल्या या ध्येयाला मिळालेल्या वैशिष्ट्यपूर्ण अवयवांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपात भगवंताची भक्ती व्हायला हवी. या भक्तीचे नऊ प्रकार वर्णन केलेले असले तरी त्याचा आरंभ स्वाभाविकच श्रवण भक्तीने होतो. माणसाला दिलेले कान हे भगवंताच्या गुणांच्या, लीलांच्या आणि चरित्रांच्या श्रवणासाठीच आहेत. त्या कथा अमृतापेक्षाही गोड आहेत. त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे शक्य असेल तेथे तेथे भगवत् कथेचे श्रवण करायला हवे. " असे विचार नागपूर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तिपरायण श्री माधव बुवा धुमकेकर यांनी केले. 

             स्थानिक जैताई देवस्थानात आयोजित शारदीय नवरात्राच्या चौथ्या दिवशी कीर्तन सेवा सादर करीत असताना ते श्री तारकाश्रम स्वामी महाराज यांच्या कथामृत संतत पान करी ! या अभंगावर निरूपण करीत होते.

           मानवी जीवनात इष्ट निश्चित नसेल तर माणूस भ्रष्ट होण्याची शक्यता असते. या भक्तीच्याच माध्यमातून अनेक लोक मुक्त झालेले आहेत मग आपण का होणार नाही?  ज्याला मनःशांती आणि अध्यात्मिक प्रगतीची अपेक्षा असेल त्याने स्त्री, धन, नास्तिक चरित्र श्रवण करू नये असे देवर्षी नारद स्पष्टपणे सांगतात. अशा विविध मुद्द्यांना स्पष्ट करीत त्यांनी विविध संत आणि पंत काव्याच्या आधारे पूर्वरंग खुलविला. 

            देवस्थानचे विश्वस्त हरिहरजी उपाख्य बंडोपंत भागवत यांनी देवस्थानच्या वतीने आई जैताईचा प्रसाद देऊन कीर्तनकारांचा सन्मान केला.

    उत्तर रंगांमध्ये राका कुंभाराची अत्यंत सुरस आणि लोकप्रिय कथा सादर करीत त्यांची पत्नी बंका आणि कन्या वंका यांचा अधिकार दाखविण्यासाठी प्रत्यक्ष पंढरीनाथानेच श्री नामदेव महाराजांना त्यांच्याकडे नेल्याचा प्रसंग त्यांनी खुलवून सादर केला.

           ‌कीर्तनात अमोल बावणे यांनी तबल्यावर तर अजित खंडारे यांनी संवादिनीवर साथ संगत केली. सूत्रसंचालन जैताईभक्त सुनील इंदु वामन ठाकरे यांनी केले



    Photo