ठळक बातम्या

    स्वतंत्र विदर्भासाठी डिसेंबर २०२७ची डेडलाईन; ‘लढू, मरू, जेलमध्ये सडू, पण विदर्भ राज्य मिळवू’चा निर्धार

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वर्धा : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वर्धा येथे विदर्भ राज्य जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेचे नेते, माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी डिसेंबर २०२७पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

    मेळाव्यात विदर्भातील विविध प्रश्नांवर वक्त्यांनी भूमिका मांडली. विदर्भात नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असूनही विकासाच्या बाबतीत हा प्रदेश मागे राहिल्याचा दावा करण्यात आला. युवकांसाठी रोजगाराच्या मर्यादित संधी, उद्योगांचा अभाव, राज्यातील नोकऱ्यांमध्ये अपेक्षित वाटा न मिळणे तसेच सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे बेरोजगारी आणि शेतीसमोरील संकट वाढत असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

    सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे विदर्भातील मोठा भाग आजही कोरडवाहू शेतीवर अवलंबून असल्याचे नमूद करण्यात आले. त्यातून शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कुपोषण आणि महिलांच्या सुरक्षिततेसारखे प्रश्न निर्माण होत असल्याची भूमिका मेळाव्यात मांडण्यात आली.

    विदर्भातील प्रश्नांचा आवाज शासनाच्या पातळीवर अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती आवश्यक असल्याचे वक्त्यांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भ राज्य हे भारतीय संघराज्य व्यवस्थेतील स्वतंत्र राज्य असेल आणि त्यातून विदर्भाच्या विकासाला स्वतंत्र दिशा मिळू शकते, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. या आंदोलनात युवक, महिला आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.

    सेवाग्राम ते वर्धा मोटारसायकल रॅली

    जनसंकल्प मेळाव्यापूर्वी सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या बापू कुटीपासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ॲड. वामनराव चटप आणि जिल्हा समन्वयक मधुसूदन हरणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत २०० हून अधिक मोटारसायकली सहभागी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

    रॅलीने वर्धा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत कारला चौक येथील विठ्ठल-रुक्मिणी सभागृह गाठले. त्यानंतर याच ठिकाणी विदर्भ राज्य जनसंकल्प मेळावा घेण्यात आला. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुढील काळात आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

    Photo