विदर्भ वार्ता |प्रतिनिधी
वणी : येथे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा. ना. श्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित संकल्प सभेला मा. पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते. मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या सभेला हजारो शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.
वणी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी कु. पायल तोडसाम यांच्यासह २९ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहे. या सर्वांच्या प्रचारासाठीच आजच्या या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथराव शिंदे साहेबांनी उपस्थितांना संबोधित करत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणाले, वणी हे महिला सबलीकरणाचे शक्तिपीठ आहे. इथे लाडक्या बहिणीची संख्या लक्षणीय आहे, इथे नगराध्यक्ष पदासाठी तुमची लाडकी बहीणच नगराध्यक्षपदासाठी उभी आहे. लाडकी बहीण योजना बंद पडावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. विधानसभेत जसा चमत्कार लाडक्या बहिणींनी दाखवला तसाच पुन्हा एकदा दाखवावा अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
वणी मध्ये कोळशाच्या खाणी असल्या तरीही सतत शहरातून कोळशाचे ट्रक गेल्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे आजार सुरू झाले आहेत. आम्ही बायपास रस्ता मंजूर करू, जेणेकरून भविष्यात शहरातून हे ट्रक जाणार नाहीत. तसेच नगर परिषदेसाठी दिलेला निधी हा विकासासाठी असून कुणाची खाजगी मालमत्ता नाही त्यामुळे या निधीचा अपहार झाला असेल तर त्या भ्रष्टाचाराची चौकशी करू असेही यावेळी त्यांनी जाहीर केले.
वणी मध्ये ट्रॉमा केअर सेंटर सुरू करू, शहरातील पाणी प्रश्न गंभीर असून तो सोडवण्याचा प्रयत्न करू, पाण्याचे प्रदूषण हा मोठा मुद्दा आहे. शिवसेनेच्या हातात वणीचा सत्ता दिल्यास प्रदूषणमुक्त वणी करू, दूषित पाणी मुक्त वणी, उत्तम रस्ते असलेले वणी शहर निर्माण करू असे नमूद केले. वणीमधील प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना त्यांनी फोनवरून निर्देश दिले, त्यांनी २४ तासात यावर कारवाई करू असे सांगितले. त्यामुळे बघतो करतो नव्हे, तर तात्काळ अंमलबजावणी करणारी शिवसेना आहे असे सांगून त्यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, महिला आघाडीच्या किरणताई विश्वास नांदेकर, विजय चोरडिया, किरण नांदेकर, विनोद मोहितकर, उपजिल्हाप्रमुख उमेश वैरागडे, तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे, शिवसेना नगरसेवक उमेदवार, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





