विदर्भ वार्ता | प्रतिनिधी
वणी : नगरपरिषद निवडणूक २०२५ चा खरा थरार बुधवारी सुरू झाला. निवडणूक आयोगाने २६ नोव्हेंबरला सर्व उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हे बहाल केल्यानंतर शहरातील प्रचाराला अक्षरशः ‘टर्बो’ लागला आहे.
शहरातील गल्लीबोळ, नागरीकांची घरटी, चौक-चौरस्ते ऑटो व रिक्षांवरील जोशात सुरू असलेल्या प्रचाराच्या गाण्यांनी दणाणून गेले. प्रत्येक उमेदवाराचे आवाजाचे प्रसारक मतदारांच्या कानात घुमवत आहेत… “यह पब्लिक है… सब जानती है!”
कोण किती आघाडीवर?
भाजपा, शिवसेना (उबाटा) आणि शिवसेना (शिंदे) हे तीनही गट मोठ्या दिमाखात, झेंडे–बॅनरात, आणि आक्रमक शैलीत शहर हादरवत आहेत.
मात्र खर्चिक प्रचारापासून थोडे दूर राहूनही काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार स्वतःच्या दमावर जोरकस लढत आहेत.
अनेक अपक्ष उमेदवारांच्या घराघरातील संपर्क मोहिमेमुळे काही प्रभागांमध्ये समीकरणे अनपेक्षितपणे बदलत असल्याचे दिसत आहे.
मतदार कोमात… कारण प्रचार ‘ओव्हरलोड’!
दिवसभर ऑटोवरून फिरणारे निवडणूक गीत, रात्री उशिरापर्यंत वाजणारे ढोल व घोषणाबाजी — या सर्वांमुळे मतदारांच्या डोक्यात गोंधळ निर्माण झाला आहे.
“कोणाला मत द्यायचं?” हा प्रश्न अनेकांची झोप उडवत आहे.
३ डिसेंबर— सस्पेन्सचा क्लायमॅक्स
वणी शहरातील वातावरण रंगात आले असले तरी अंतिम निर्णय मतदारच घेणार.
मतदारांच्या बोटातील शाईच सांगेल विजयाची माळ कुणाच्या गळ्यात?३ डिसेंबरलाच हा सर्व संशयाचा धुके दूर होणार असून, वणी शहराचा पुढील पाच वर्षांचा राजकीय चेहरा कोण ठरवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

