विदर्भ वार्ता | प्रतिनिधी
वणी :नगरपरिषद निवडणूक २०२५-२६ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ३ हा सर्वाधिक चर्चेत राहणारा प्रभाग ठरत आहे. प्रचाराची हवा चांगलीच फिरली असून मतदारांची भूमिका कोणत्याही क्षणी चित्र पालटू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
प्रभाग ३ मध्ये शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार सौ. शुभांगी रवींद्र ठेंगणे आणि जगन पुरुषोत्तम खंडाळकर यांनी घराघरात, गल्लीबोळांत आणि बैठकीत आक्रमक उपस्थिती दाखवायला सुरुवात केली आहे. स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद साधत त्यांच्या प्रचाराने गती घेतल्याचे दिसून येत आहे.
अलीकडच्या काही दिवसांत मतदारांचा कल जाणून घेतला असता दोन्ही उमेदवारांविषयी “स्पष्ट पसंती” व्यक्त करणारे मत वाढताना आढळते. परिणामी विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या समीकरणावरही परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पाणीपुरवठा, गटारव्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा, तसेच प्रभागातील प्रलंबित विकासकामांबाबत नागरिकांच्या मनातील असंतोषामुळेच मतदारांचा कल बदलताना दिसतो, असा अंदाज स्थानिक जाणकारांनी व्यक्त केला आहे. प्रभाग ३ मध्ये वातावरण इतके तापले आहे की“जिंकायचं कोणाला, पण लढाई कुणाशी?”असा प्रश्न मतदार स्वतः विचारताना दिसत आहेत. एकूणच, शिंदे गटाच्या उमेदवारांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रभाग ३ ची निवडणूक चुरशीची नव्हे तर निर्णायक ठरणार, अशी चर्चा चांगलीच रंगली आहे.


