ठळक बातम्या

    घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याची भाजपची मागणी

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    मारेगाव : मारेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पार्टी, मारेगाव तालुका यांच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    घरकुल योजनेअंतर्गत घर बांधकामासाठी रेती ही अत्यावश्यक बाब असताना, सध्या मारेगाव तालुक्यात घरकुल लाभार्थी व बांधकाम धारकांना रेती मिळविण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घरकुल बांधकामाचे काम रखडले असून प्रकल्प विलंबित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    या पार्श्वभूमीवर भाजप तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सर्व घरकुल लाभार्थी व बांधकाम धारकांना शासन नियमांनुसार रेती उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही तात्काळ सुरू करावी, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यामुळे घरकुल प्रकल्पाच्या कामांना गती मिळेल आणि तालुक्यातील गरजू कुटुंबांचे स्वतःचे घर होण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होईल, असे नमूद करण्यात आले आहे.

    जर येत्या आठ दिवसांत घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून दिली नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनाच्या काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    हे निवेदन भारतीय जनता पार्टी मारेगाव  अविनाश लांबट ता. अध्यक्ष भाजपा, प्रशांत नांदे ता. सरचिटणीस भाजपा, प्रसाद ढवस ता. सरचिटणीस भाजपा, मारोती तुराणकर ता. उपाध्यक्ष भाजपा, सुनील देऊळकर भाजपा युवा मोर्चा ता. अध्यक्ष, ईफ्तेखार शेख अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष, राजेश पांडे जिल्हा युवा मोर्चा सचिव भाजपा व इतर पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले आहे.

    Photo