ठळक बातम्या

    मुंगोली विस्तार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या; विजय पिडुरकर यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : मुंगोली (ता. वणी) येथील विस्तार प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीजमिनी अधिग्रहण प्रक्रियेत समाविष्ट करून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिडुरकर यांनी उपविभागीय अधिकारी, वणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    निवेदनात नमूद केल्यानुसार, मुंगोली गावातील विस्तार प्रकल्पासाठी सन २०१४-१५ मध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. संबंधित शेतकऱ्यांना वेकोलीकडून लेखी आश्वासनपत्रही देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष अधिग्रहणाची कार्यवाही न झाल्याने शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहेत.

    प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून रोजगार व मोबदल्यापासून ते वंचित राहिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच, संबंधित शेतजमिनी गावापासून दूर असून तेथे शेती करणेही कठीण झाले आहे. वेकोलीच्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे शेतात पाणी साचणे, रस्त्यांची समस्या निर्माण होणे तसेच वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतीचे उत्पन्न घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

    कोलगाव येथे झालेल्या जनसुनावणीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी प्रशासनाने अधिग्रहण प्रक्रियेस मान्यता दर्शविली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

    यामुळे मुंगोली विस्तार (चिचोली-शिवणी) प्रकल्पात संबंधित गट क्रमांक ४६ व ४८ मधील शेतजमिनींचा समावेश करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विजय पिडुरकर यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.




    Photo