अर्धवट रस्त्यांमुळे शेतकरी संतप्त; कंत्राटदाराविरोधात मनसे आक्रमक
वणी : वणी तालुक्यातील ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत व पांदण रस्ते’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या अनेक रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदाराने अर्धवट सोडून दिल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. ऐन मशागतीचा आणि पेरणीचा हंगाम सुरू असताना रस्त्यांची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणेही कठीण झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी तहसीलदारांना निवेदन देत दोन दिवसांत कामे पूर्ण न झाल्यास "मनसे स्टाईल" आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील शेलू (बु.)-निवली, पुरड-नवेगाव, पुरड-खांदला, पुरड-निवली आदी मार्गांची कामे अपूर्ण अवस्थेत पडून असून अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री शेतात नेणे अवघड झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मनसेने निवेदनात शेलू (बु.) ते निवली या पांदण रस्त्याच्या कामातील कथित अनियमिततेचाही मुद्दा उपस्थित केला आहे. मंजूर आराखड्यानुसार ३० फूट रुंदीचा रस्ता होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी केवळ २० फूट रुंदीचे काम करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांचे संगनमत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी फाल्गुन गोहोकार म्हणाले, "शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी वेठीस धरला गेला आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोन दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा मनसेच्या खळखट्याक शैलीत तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील."
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) तसेच गटविकास अधिकारी (बीडीओ), पंचायत समिती वणी यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्रशासन कंत्राटदारावर कारवाई करून रखडलेली कामे पूर्ण करते की आंदोलनाची वाट पाहते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
निवेदन सादर करताना मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे यांच्यासह प्रवीण कळसकर, गजानन मोहितकर, वामन पाचभाई, अनिल ताजने, उमेश आसुटकर, राहुल खामनकार, राजू आसुटकर, अमोल पिदुरकर, भगवान मालेकर, आकाश पाचभाई, गणेश मालेकर, उमेश नक्षीने, ईश्वर मालेकर, कुंडलिक मालेकर आणि तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
— शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मनसे मैदानात; आता प्रशासनाची कसोटी!


