विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : मानवी जीवन ही आपल्याला मिळालेली सगळ्यात सुंदर भेट आहे. अन्य कोणत्याही जीवनात नसलेली सुविधा म्हणजे स्वतःच्या जीवनाचे सार्थक करण्याची क्षमता याच आयुष्यात आपल्याला प्राप्त होते. शुद्ध आचरण आणि सत्कर्माच्या द्वारे आपण मिळालेल्या संधीचे सोने या स्वरूपात या आयुष्याचे सार्थक करायला हवे असे विचार सुप्रसिद्ध व्याख्यात्या निलिमाताई काळे यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित होत असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा माझं गाव माझ्या वक्ता या व्याख्यान मालिकेमध्ये "आपली आपण करावी सोडवण "या विषयावर त्या व्यक्त होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे ज्येष्ठ सदस्य तथा प्रख्यात नाट्य कर्मी श्री अशोक सोनटक्के उपस्थित होते.
आपल्या शांत आणि स्वानुभव पूर्ण प्रगटीकरणात नीलिमाताई काळे यांनी त्यांच्या जीवनात आधारभूत असणारे आध्यात्मिक विचार व त्यांचे श्रीगुरू दादाजी महाराज यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
मन्युष्य जन्म हा मोठ्या पुण्याईने मिळते.तो कसा सार्थकी लावायचा? हे आपल्या सामान्य माणसाच्या हाती असते.सत्याने राहा या कलियुगात खरे कोण आपल्याला मार्गदर्शन करते हे ओळखणे आपल्या हाती आहे असे सांगितले विविध उदाहरण आणि आपल्या जीवनातील अनुभवांनी स्पष्ट करीत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विदर्भ साहित्य संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करीत या निमित्ताने अनेक नवनवीन लोकांना व्यासपीठ प्राप्त होत आहे याबद्दल अशोक सोनटक्के यांनी समाधान व्यक्त करीत नीलिमाताई काळे यांच्या प्रयत्नांची कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे सचिव डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन सहसचिव राजेश महाकुलकार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद लोणारे, राम मेंगावार, देवेंद्र भाजीपाले तथा कल्पनाताई राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.


