विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: मौजा मुंगोली गावाच्या पुनर्वसनासाठी वेकोलि (WCL) मार्फत कुर्ली शिवारात उभारण्यात आलेल्या पुनर्वसन वसाहतीतील विकासकामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनाला काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ व उपविभागीय अधिकारी वणी यांना दिलेल्या निवेदनातून ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुनर्वसन वसाहतीतील बांधकामे निकृष्ट दर्जाची होत असल्याबाबत ३० ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रारी व स्मरणपत्रे सादर करण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना कामाची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र प्रत्यक्ष स्थळ पाहणी झाली की नाही, तसेच कोणता अहवाल सादर करण्यात आला याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, २३ एप्रिल २०२६ रोजी वेकोलि कंपनीने ग्रामपंचायतीला पत्र पाठवून काही नागरिकांवर नाल्यांचे नुकसान केल्याचा आरोप करत दुरुस्तीची नोटीस बजावली. मात्र गावकऱ्यांनी नुकसान केलेले नसून त्याचा खर्च नागरिकांवर टाकणे अन्यायकारक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.
पुनर्वसन वसाहतीत अनेक ठिकाणी नाल्या तुटलेल्या अवस्थेत असून पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच मंदिर व पाण्याच्या टाकीजवळ खोल खड्डे खोदून ठेवण्यात आल्याने लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत :
पावसाळ्यापूर्वी तुटलेल्या नाल्यांची दुरुस्ती व स्वच्छता करावी.
मंदिर व पाणी टाकीजवळील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत.
दर्जेदार काम पूर्ण होईपर्यंत संबंधित कामांची देयके रोखावीत.
संबंधित ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश करावा.
गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करून कामाचा दर्जा तपासावा.
ग्रामपंचायत व दवाखाना बांधकामातील अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा दिला असून, तातडीने चौकशी व कारवाई न झाल्यास पुनर्वसन वसाहतीतील सुरू असलेली कामे बंद पाडण्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आयुष रो ठाकरे,बाबाराव ठाकरे, मारोती ठाकरे,संजय वाटेकर,गणेश बावणे, विठ्ठल खंडाळकर, गणेश आत्राम,शुभम तुमाने,कविता टेकाम,कविता पुरडकर,आशा शिंदे,प्रतिभा क्षीरसागर, बावणे,नंदिनी आत्राम,बावलाबाई आत्राम, अनिता खंडाळकर, ज्योती खंडाळकर,आनंदी तुमाने,शुभम भोस्कर,रोहीदास ठाकरे,जया आत्राम,सुदर्शन शिंदे,मनिष भोस्कर,पपीता तुमाने,रुपा टेकाम,राजु बावणे,विजय सोनटक्के, जयश्री सोनटक्के,संजय टेकाम यांच्या कडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंगोली पुनर्वसन प्रकल्पातील कथित अनियमिततेचा प्रश्न आता अधिक गंभीर बनला असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





