ठळक बातम्या

    राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनी उत्साहात संपन्न

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.

    या विज्ञान प्रदर्शनीत शाळेतील सुमारे ४० विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध विषयांवरील आकर्षक व नाविन्यपूर्ण प्रतिकृती सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक विचारांचे दर्शन घडविणाऱ्या या प्रतिकृतींना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

    प्रदर्शनीचे परीक्षण करण्यासाठी जनता विद्यालय, वणी येथील शिक्षक श्री. राजेंद्र जेनेकर व श्री. नरेश बेलेकर हे प्रमुख परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्रत्येक प्रतिकृतीचे बारकाईने परीक्षण करून विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अभय पारखी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचा दैनंदिन जीवनातील उपयोग, नवोपक्रमांची गरज आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

    कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. प्रभुदास नगराळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. तुषार घाने यांनी मानले. विज्ञान प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची जिज्ञासा आणि संशोधनाची प्रेरणा अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

    Photo