विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मोहदा येथे घडलेल्या तब्बल 97 लाख 50 हजार रुपयांच्या ज्वेलर्स चोरीचा आणि दरोड्याच्या गुन्ह्याचा अखेर पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. शिरपूर पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर आरोपींना अटक करत 60 लाख 10 हजार 802 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै 2026 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोहदा येथील वर्मा ज्वेलर्स दुकानाचे शटर फोडून आत प्रवेश केला. दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा 97 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या घटनेनंतर पांढरकवडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याच परिसरात 14 जुलै 2026 रोजी मोहदा-मेटीखेडा मार्गावर रविंद्र कांबळे यांना सात ते आठ जणांनी अडवून त्यांच्या जवळील 3 ग्रॅम सोन्याची अंगठी व रोख रक्कम, असा 44 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेल्याची दरोड्याची घटना घडली होती. या दोन्ही गंभीर गुन्ह्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.
गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश ते पुणे... तपासाची धाव
आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश तसेच पुणे येथे तपासाची व्यापक मोहीम राबवली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन पुणे परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाहन ताब्यात घेत आरोपींना अटक केली. कसून चौकशीत आरोपींनी चोरी आणि दरोड्याची कबुली दिल्यानंतर सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा 60 लाख 10 हजार 802 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष मनवर, पोलीस हवालदार इकबाल शेख, प्रशांत झोड तसेच पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुडमेथे आणि प्रफुल नाईक यांनी संयुक्तपणे पार पाडली. अल्पावधीत कोट्यवधींच्या चोरीचा छडा लावत आरोपींना गजाआड करण्यात यश आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

