विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी तालुक्यातील सावर्ला गावाजवळील शेतात २५ वर्षीय तरुण मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे सावरला गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत युवकाचे नाव अनिकेत तुकाराम तुराणकर (वय २५) असे असून तो मजुरी करून उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास सावरला गावालगतच्या शेतात त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. या घटनेने सावरला गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
