ग्रामसभेत तंटामुक्ती समितीची स्थापना; गावातील अवैध धंदे बंद करण्याला प्राधान्य देणार – वैभव गौरकार
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : तालुक्यातील मौजा मानकी येथे १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत गावातील तंटे व वाद सामोपचाराने सोडविण्यासाठी तंटामुक्ती समिती गठीत करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी वैभव संजय गौरकार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तंटामुक्ती समितीच्या सचिवपदी पोलिस पाटील सौ. मिनाक्षी मिलमीले यांची निवड करण्यात आली. तसेच बिट जमादार, ॲड. प्रविण पुरी, पत्रकार परशुराम पोटे, प्रशांत खाडे, सचिन वासेकर, निखिल गोहणे, सुरेश क्षिरसागर, सौरभ वासेकर, हर्शल मिलमीले, सौ. अरुणा वासेकर आणि सौ. सविता पहापळे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच कैलास पिपराडे, उपसरपंच शंकर माहुरे, तलाठी सौ. पाचभाई, पोलिस पाटील सौ. मिनाक्षी मिलमीले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवैध धंदे बंद करण्याला प्राधान्य
मानकी गावात अवैध दारू विक्री तसेच जुगाराचे प्रकार सुरू असल्याने गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे नवनियुक्त तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वैभव गौरकार यांनी सांगितले. गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
– वैभव गौरकार
नवनियुक्त अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, मानकी

