ठळक बातम्या

    ग्रामसभा अर्धवट सोडल्याचा आरोप; परमडोह ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : परमडोह ग्रामपंचायतीमध्ये १८ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत विविध विकासकामे, शासकीय योजनांचा निधी व मागील पाच वर्षांतील खर्चाबाबत माहिती मागितली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच प्रश्न विचारणाऱ्या युवकांना धमकावण्यात आल्याचा आणि त्यानंतर सचिव व सरपंच यांनी ग्रामसभा सोडून गेल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पंचायत समिती वणीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

    श्री. प्रवीण दिलीप ढवस व इतर ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, सन २०२१ ते २०२६ या कालावधीत ग्रामपंचायतीला विविध योजनांतून प्राप्त झालेला निधी, झालेली विकासकामे, त्यांचा खर्च, कामे पूर्ण-अपूर्ण स्थिती तसेच ग्रामसभेची मान्यता याबाबत माहिती मागण्यात आली.

    यामध्ये अमरनाथ बावणे ते अमोल झाडे यांच्या घरापर्यंत भूमिगत नालीचे बांधकाम, सार्वजनिक शौचालय, अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील फर्निचर खरेदी, जलजीवन मिशनअंतर्गत नळजोडणी, १५ वा वित्त आयोग, ग्रामपंचायतीचा गृहकर व वीजकरातून जमा झालेला निधी आणि त्यावरील खर्च यांचा समावेश आहे.

    याशिवाय ACC सिमेंट कंपनीच्या CSR निधीतून झालेली रस्ते, सुरक्षा भिंत, अंगणवाडी, आरो व सभागृह आदी कामे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामे तसेच दिव्यांगांसाठीच्या ५ टक्के निधीचा वर्षनिहाय वापर याबाबतही ग्रामस्थांनी माहिती मागितली.

    ग्रामस्थांच्या आरोपानुसार, ग्रामसभेत काही खर्च व बिलांबाबत माहिती समोर आली. सुरज मल्टीकडून स्ट्रीट लाईट, जलड्राफ्ट, अंगणवाडी व शाळेच्या फर्निचरसाठी सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचे बिल, साई डिजिटलकडील संगणक साहित्याच्या बिलाबाबत तसेच तेंदूपत्ता बोनसच्या रकमांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, या बाबींवर समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

    प्रश्न विचारणाऱ्या युवकांना ग्रामसेवक अनिल टेभुर्णे यांनी कारवाईची तसेच शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत माहिती कोणाकडे मागायची, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाआहे.ग्रामसभा सोडून जाण्याच्या प्रकारामुळे उपस्थित महिला, पुरुष, युवक व युवतींच्या अधिकारांचा अवमान झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी मागील पाच वर्षांतील विविध योजनांच्या निधीचा वापर व खर्चाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून सात दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी यांच्याकडे श्री. प्रवीण दिलीप ढवस,श्री. चंद्रशेखर आनंदराव काकडे,श्री विठ्ठल शंकर दरेकर, श्री. रामभाऊ कान्होबा वाभीटकर,श्री. अमोल मधुकर झाडे, शुभम दिलीप झाडे, पांडुरंग नागोबा पेंदोर , राजु प्रभाकर वाभिटकर ,दिलीप रामचंद्र ढवस,श्वी सुरेश सोयाम व उपस्थित नागरिक यांनी केली आली आहे.

    या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी यवतमाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांनाही माहिती व कार्यवाहीसाठी सादर करण्यात आल्या आहेत.

    Photo