विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : भारतीय संस्कृतीचा आधार असणाऱ्या संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कटिबद्ध असणाऱ्या संस्कृत भारती शाखा वणी तथा लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या संयुक्त विद्यमाने वणी शहरात संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये सोमवार दिनांक २४ ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट रोजी जैताई देवस्थान मध्ये सायंकाळी साडेचार वाजता महिला मंडळात द्वारे विविध देवी तथा शिव स्तोत्रांचे पठण करण्यात येणार आहे.
दिनांक २६ रोजी जैताई देवस्थान येथेच सायंकाळी ५ ते ७ या वेळात ६४ कला प्रदर्शनी या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे.
यामध्ये प्राचीन काळात कोणत्या चौसष्ट कला मानवी जीवनाचा अध्ययन विषय होत्या आणि त्या आधारे मानवी जीवन अधिक सुंदर आणि आस्वाद्य होत होते यांचे सचित्र सादरीकरण करण्यात येईल. त्या कलांची नेमकी नावे आणि त्यांचे स्वरूप यांचे महत्त्व विशद करणारी ही प्रदर्शनी असेल.
सोबतच "महाभारत प्रश्नावली" या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये दिनांक २४ ऑगस्ट पासून पुढे सलग सात दिवस महाभारतावर आधारित दहा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा गूगल फॉर्म सहभागींना उपलब्ध करून देण्यात येईल. ( हा उपक्रम केवळ वणी नगरीतील संस्कृत प्रेमी जनतेसाठी मर्यादित आहे.) पूर्णपणे ऑनलाईन आणि निःशुल्क स्वरूपातील अशा उपक्रमाचे प्रथमच आयोजन होत आहे हे विशेष उल्लेखनीय.
यासोबतच वदतु संस्कृतम् ! या पुस्तकाच्या माध्यमातून घरोघरी संपर्क करून संस्कृतचा प्रचार तथा रक्षाबंधनाच्या उपक्रमाचे देखील आयोजन होणार आहे
समस्त वणीकर बंधू-भगिनींनी या सर्व कार्यक्रमाचा आणि उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

