विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान होत असून अनेक भागांत शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने कागदोपत्री पाहणी आणि पंचनाम्यांच्या प्रक्रियेत वेळ न घालवता प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने मदत जमा करावी, असे ठाकरे यांनी म्हटले.
दुष्काळाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून पशुधनावरही होत आहे. जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध होत नसल्याने शासनाने चारा छावण्या सुरू करून किंवा आवश्यक त्या माध्यमातून चाऱ्याची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकरी आणि पशुपालकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
