विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : माहितीच्या अधिकाराचा वापर, सामाजिक जनजागृती आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवर कायदेशीर मार्गाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, वणी शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ, उपविभागीय अधिकारी, वणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या माध्यमातून नागरिकांना माहितीच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन करणे, शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व राहण्यासाठी पाठपुरावा करणे, सार्वजनिक समस्यांबाबत निवेदने व तक्रारी सादर करणे, शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच विकासकामांमधील पारदर्शकतेसाठी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच भ्रष्टाचार, गैरप्रकार किंवा अनियमितता निदर्शनास आल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे कायदेशीर पद्धतीने तक्रारी करण्यात येतात. या कामादरम्यान काही प्रकरणांत संबंधितांकडून गैरसमज, दबाव, धमकी किंवा त्रास निर्माण होण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
भविष्यात कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याच्या जीवितास, सुरक्षिततेस अथवा मालमत्तेस धोका निर्माण झाल्यास त्याची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ते कायदेशीर संरक्षण व मदत द्यावी. तसेच धमकी, दबाव किंवा त्रासाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्याची गांभीर्याने दखल घेऊन कायद्यानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी फैयाज अली खान, कवठु देवाजी बडस्कार, धनंजय भिकाजी भोयर, मोहम्मद इम्रान शेख महेबूब, शेख शकील शेख कय्युम, नितीन रामदास काकडे, जितेंद्र महादेवराव डाबरे आणि लहानु निळकंठ सालुरकर यांनी निवेदनातून केली आहे.

